सोलापूर हादरलं! एक हजार रूपयासाठी चापट मारली... तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर :- सोलापुरात फक्त 1 हजार रुपयांवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गुरुदत्त नगर भागात घडली. दशरथ अर्जुन धोत्रे (टेम्पो चालक) असे मृत तरुणाचे नाव आहे. दशरथ याने गोविंद बिराजदारकडून काही काळापूर्वी 1 हजार रुपये उसने घेतले होते. बुधवारी तो घराजवळील ड्रेनेज पाइपवर बसला असताना, गोविंद त्याला पैसे मागण्यासाठी तेथे आला. वाद वाढताच गोविंदने दशरथला चापट मारली, त्यानंतर दशरथ बेशुद्ध होऊन कोसळला. त्याचा भाऊ युवराजने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार उसने दिलेल्या रकमेच्या मागणीतील वादातून घडला आहे. ही घटना सोलापुरात नुकत्याच घडलेल्या सावकारी त्रासामुळे आत्महत्येच्या घटनेनंतर समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.