सोलापूर खळबळजनक हत्या: कलाकेंद्रावर नाचायला पाठविल्याचा संशय; सावत्र दीराने भावजयीचा कुऱ्हाडीने खून

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथे संशयातून
झालेल्या घटनेने एकच खळबळ उडवली आहे. पत्नीला कलाकेंद्रावर नाचण्यासाठी
शिकविल्याचा गैरसमज करून सावत्र दीराने सावत्र भावजयीचा निर्घृण खून केल्याची घटना
घडली. खून झालेल्या महिलेचे नाव हेमा आकाश काळे (वय ३५) असे आहे. गुरुवारी (४
जुलै) सायंकाळी साडेचार वाजता करकंब येथील टेंभी रोड परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकुंदराजा काळे, त्याचे वडील बिंदूल काळे आणि सावत्र आई शालिका काळे यांनी मिळून हेमा काळे
हिच्यावर हल्ला केला. या वेळी आकाश काळे हे पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेले होते.
दरम्यान, मुकुंदराजाची पत्नी मागील महिनाभरापासून
जामखेड येथील कलाकेंद्रावर नाचायला जात होती. त्या गोष्टीला हेमाने शिकवले आणि
पाठवले, असा गैरसमज मुकुंदराजाला झाला होता. याच रागातून
त्याने हत्येचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी वाद वाढला असता आरोपींनी हेमाला
पकडले आणि मुकुंदराजा काळे याने हातातील कुऱ्हाड घेऊन तिच्या मानेवर जबर वार केला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमाला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र,
डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. घटनेनंतर पती
आकाश काळे यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत
मुख्य आरोपी मुकुंदराजा काळे याला अटक केली आहे. इतर आरोपींची चौकशी सुरू आहे. या
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलिस
निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.