सोलापूर महापालिका निवडणूक: शिंदेसेना–अजित पवार राष्ट्रवादीची युती, 51-51 जागांचा फॉर्म्युला; भाजप बाहेर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस
गटाने सोलापुरात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीची अधिकृत घोषणा करण्यात
आली असून, दोन्ही पक्षांनी १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्यावर एकमत साधले
आहे. या युतीत विशेष म्हणजे भाजपला बाहेर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे
नेते वसीम बुऱ्हाण यांनी स्पष्ट केले की, भाजपकडून युतीसाठी
कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे शिवसेना–राष्ट्रवादी हीच आघाडी
सोलापुरात निवडणूक लढवणार आहे. शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने
सोलापूर महापालिकेत महापौर आपलाच बसवणार, असा ठाम दावा केला
आहे. दोन्ही पक्षांनी शहरातील राजकीय गणित लक्षात घेऊन समसमान जागावाटपाचा निर्णय
घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीमुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे
बदलली असून, एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे
शिंदेसेना–राष्ट्रवादी युती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. भाजप युतीबाहेर
राहिल्याने आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.