सोलापूर महापालिकेचा कारभार आज ठरणार, १०२ जागांसाठी ५५ टक्के मतदान; सकाळी दहापासून मतमोजणी

सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी गुरुवारी (दि. १५) झालेल्या निवडणुकीनंतर आज शुक्रवारी (दि. १६) निकाल जाहीर होणार आहे. शहराच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सरासरी ५५ टक्के मतदान झाले असून ५६४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी १० वाजता सुरू होणार असून शहरातील सात वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी १५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून दर तासाला प्रभागनिहाय निकाल जाहीर केला जाणार आहे. चार सदस्यसंख्या असलेल्या प्रभागांसाठी १४ फेऱ्यांमध्ये, तर तीन सदस्यसंख्या असलेल्या प्रभागांसाठी नऊ ते दहा फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान पाऊण तासाचा कालावधी लागणार असून, या गतीने दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत संपूर्ण महापालिकेचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असून, हा निकाल सोलापूरच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरणार आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी सकाळी काही प्रमाणात नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४०.३९ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र, दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याने मतदानाची टक्केवारी वाढून सुमारे ५३ ते ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंतिम आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.