सोलापूर: मोलकरीणने मालकाच्या कपाटातून चोरले ९ लाख

सोलापूर : मालकाच्या घरातील कपाट बनावट चावीने उघडून ०९ लाख रुपयांची घरफोडी केलेल्या करामती मोलकरणीस शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने अवघ्या ०३ तासात ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. फराना फारुख शेख असं तिचं नांव आहे. तिच्या राहत्या घरातून ०९ लाख रूपयांची रोकड तिच्या घरातून हस्तगत करण्यात आलीय. स्टील व सिमेंट व्यवसायिक सिध्देश्वर पेठेतील रहिवासी रमिज सलिम साबुनगर (वय ३८ वर्षे) हे, २४ एप्रिल रोजी, राहत्या घरास कुलुप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते. २६ एप्रिल रोजी, त्यांना शेजाऱ्यांनी, त्यांच्या बंद घरातून, धुर येत असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यानंतर, रमिजचे वडील सलिम साबुनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता, घराचे मुख्य दरवाजाचे तसेच कम्पाऊंडचे कुलुप 'जैसे थे' होते. लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले ९,००,००० रुपये त्या ठिकाणी नसल्याचे त्या रात्री घरी परतलेल्या रमिज साबुनगर यांच्या निदर्शनास आले. अज्ञातानं बनावट चावीचा वापर करुन ती रोकड चोरल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी मंगळवारी, २९ एप्रिल रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी-पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर, गुन्हे शाखेचे पोउपनि अल्फाज शेख व पथकाने घटनास्थळाचे आजु-बाजुचे सुमारे ०१ किमी परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन, त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार, पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने, रमिज साबुनगर यांच्या घरी काम करणारी मोलकरीण फराना फारुख शेख हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल व कौशल्याने तपास करून तिने चोरलेली ०९ लाख रूयांची रोख रक्कम फॉरेस्टमधील लोणावत चाळीतील तिच्या राहत्या घरातून काढुन दिल्याने, ती रक्कम जप्त करुन, हा गुन्हा ०३ तासात उघडकीस आणला. फराना शेख त्या घरात मागील ०७ ते ०८ वर्षापासून घरकाम करण्याचे काम करीत होती. साबुनगर परिवार दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करुन, लोखंडी कपाटामध्ये ठेवताना तिने बरेच वेळा पाहिले होते. फराना शेख हिने त्या घरामध्ये काम करत असताना, त्यांच्या घरातील ०२ चाव्यापैकी एक चावी घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती. त्या दिवशी सलिम साबुनगर दुपारी त्यांच्या दुकानी गेले असल्याचा फायदा घेऊन, मोलकरीण फराना हिने चावी बनवणाऱ्या इसमास फोनव्दारे बोलावून घेतले. तिच्याजवळ असणाऱ्या चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचे कुलुप उघडले. त्यानंतर, चावी बनवणाऱ्या इसमास ते, घर तिचे स्वतःचे असून, सामान शिफ्टींग करावयाचे आहे. घरातील एका कपाटाची चावी हरवली आहे, त्याची चावी करावयची आहे अशी थाप मारून त्याच्याकडून कपाटाचे लॉक तोडले. त्यावेळी कपाटाचे लॉक तुटले असून, त्यास नवीन लॉक बसवावे लागेल, असं चावीवाल्याने सांगितले. चावीवाल्यास लॉक आणावयास पाठवून, तिने कपाटातील ०९ लाख रुपये रोख रक्कम चोरी केली. तसेच कपाटास अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराचे मुख्य दरवाजा व गेटला कुलुप लावून तेथुन निघून गेली. तिने त्या चावी वाल्याच्या दुकानी जाऊन त्याला ०२ हजार रुपये मजुरी दिल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.