सोलापूर गुंठेवारी प्रश्न मार्गी लागणार; महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय

सोलापूर: सोलापूर महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुंठेवारीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, शहरात अडकलेल्या मोजण्या आता गतीने पूर्ण होणार आहेत. या बैठकीस आमदार विजय देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकित मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, महापालिकेकडून लेआऊट मिळण्यात अडचणी येत असल्याने आता खासगी आर्किटेक्टकडून लेआऊट घेण्यात यावा. मोजणी विभागाने ते स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अर्जांनुसार तत्काळ मोजणी करून द्यावी.

कॉम्प लावून मोजणी प्रक्रियेला चालना
महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, आमदारांशी चर्चा करून शहरात कॉम्प (कम्प्युटराईज्ड मोजणी केंद्र) सुरू करावेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेली जमीन मोजणीची कामे मार्गी लागतील आणि नागरिकांचे पैसे वाचतील.

शहर विकासात अडथळा दूर होणार
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमध्ये अनेक नागरिकांच्या जमिनींची नोंदणी व मोजणी न झाल्यामुळे गुंठेवारी पद्धतीने बांधकामे थांबली होती. काही नागरिकांनी एकाच जमिनीचे एकाधिक व्यवहार केल्याने वाद निर्माण झाले होते. मात्र, महसूल विभागाच्या नव्या धोरणामुळे शहर विकासाला आता गती मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गतिमान कारभाराचे उदाहरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान शासनाचा हा उत्तम नमुना आहे. घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा,” असे निर्देशही मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. आमदार विजय देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत करत महसूलमंत्र्यांचे अभिनंदन केले.