उजनी परिसरातून केळी निर्यातीला भरारी; सोलापूर जिल्हा बनतोय ‘बनाना हब’
करमाळा (जि. सोलापूर) : जळगाव
जिल्ह्याची ओळख असलेली केळी लागवड आता सोलापूरमध्ये नवे केंद्र निर्माण करू लागली
आहे. विशेषतः उजनी धरण परिसरातील कृषी पट्ट्यात अलिकडच्या काळात केळीची शेती
मोठ्या प्रमाणात वाढली असून, गेल्या पाच वर्षांत या भागातील केळी
निर्यात सतत चढत्या रेषेत आहे. परिणामी, सोलापूर जिल्हा
हळूहळू ‘बनाना हब’ म्हणून उदयास येत आहे. मागील वर्षात
सोलापूर जिल्ह्यातून तब्बल ३९,७२७ कंटेनर केळीची निर्यात करण्यात
आली. या निर्यातीमुळे देशाला जवळपास ४,००० कोटी रुपयांचे
परकीय चलन प्राप्त झाले आहे. हवामान, मातीची रचना आणि
सिंचनाच्या उपलब्धतेमुळे या भागात निर्यातक्षम केळीचे पीक वर्षभर घेतले जाते,
असे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले. त्यांनी
पुढे नमूद केले की, “शेतकऱ्यांनी बाजारातील चढ-उतारांचा
विचार करून टप्प्याटप्प्याने लागवड केली, तर नुकसान टाळता
येऊ शकते.”
६० टक्के केळी आखातात निर्यात
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १५ लाख मेट्रिक टन
केळीचे उत्पादन होते. यापैकी ४० टक्के उत्पादन स्थानिक बाजारपेठेत आणि देशातील
विविध राज्यांमध्ये विकले जाते, तर उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशांत
(Gulf Countries) निर्यात केली जातात.
करमाळा–माढा बनत आहेत ‘केळीचे हब’
करमाळा आणि माढा हे तालुके केळी उत्पादन आणि निर्यात
यांसाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे. टेंभुर्णी परिसरात देशातील सर्व प्रमुख केळी
निर्यातदार कंपन्यांनी कार्यालये उघडली आहेत. वर्षभर निर्यातक्षम माल उपलब्ध
असल्यामुळे या उद्योगात दहा हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. सोलापूर
जिल्ह्यातील वाढती उत्पादनक्षमता, सातत्यपूर्ण सिंचन आणि प्रगत शेती
पद्धतींमुळे येत्या काळात हा जिल्हा राज्यातील अग्रगण्य केळी निर्यात केंद्र बनेल,
असा तज्ञांचा अंदाज आहे.