सोलापूरमध्ये थरार! आर्थिक वादातून पती-पत्नीवर हल्ला; डोळ्यात चटणी टाकून पतीचं अपहरण
सोलापूर:- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक धक्कादायक
प्रकार घडला आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून तिघांनी मिळून पती-पत्नीवर हल्ला
करून पतीचे अपहरण केले. ही घटना गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास
महूद येथील एका हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी काजल दत्ता माने (रा. महूद, ढाळेवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिसांकडे तक्रार
दाखल केली आहे. सांगोला पोलिसांनी संग्राम महादेव गिड्डे, राजेश
गिड्डे आणि शबप्पा (बप्पा) गिड्डे (तिघेही रा. सापटणे, ता.
माढा) या आरोपींविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार,
फिर्यादींचे पती दत्ता संजय माने ऊस तोडणी मशिनवर कामासाठी ऑपरेटर
देतात. त्यासाठी त्यांनी आरोपींकडून पैसे घेतले होते. या व्यवहारातून पैसे परत
देण्याच्या वादावरून आरोपींनी गुरुवारी दत्ता माने यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न
केला. काजल माने यांनी विचारणा केली असता, आरोपी बप्पा
गिड्डे यांनी तिच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर तिला दमदाटी करून उजव्या हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर
तिघांनी पती-पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि दोरीने पतीचे हातपाय बांधून
जबरदस्तीने त्याचे अपहरण केले, असे तक्रारीत नमूद आहे. सांगोला
पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच
खळबळ उडाली आहे.