महानगरपालिका निवडणुकीआधी सोलापुरात मोठा राजकीय धक्का; राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपात दाखल
सोलापूर :- महानगरपालिका निवडणुकीसाठी काही दिवसांत
मतदान होणार असतानाच सोलापूरच्या राजकारणात धक्कादायक घडामोड घडली आहे. शहरातील
प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अधिकृत उमेदवार
तुषार जक्का यांनी अचानक भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रचाराच्या ऐन
रणधुमाळीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली
आहे. तुषार जक्का यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या
प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या अगदी तोंडावर
राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपाची वाट धरल्याने संबंधित प्रभागातील
राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी प्रभाग क्रमांक
९ ड मध्ये भाजपाचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी
काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना (ठाकरे गट) चे सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी
लढत अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने
भाजपाला पाठिंबा दिल्याने आता ही लढत एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी
काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, भाजपाचे
पारडे या प्रभागात अधिक जड झाल्याचे चित्र आहे. भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा
उमेदवार आपल्या गोटात घेतल्याने निवडणुकीपूर्वीच विरोधकांना मोठा धक्का बसल्याचे
बोलले जात आहे. सोलापूर शहरातील इतर प्रभागांमध्येही याचे पडसाद उमटण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.