सोलापूर महापालिकेत राजकीय भूकंप; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर भाजपमध्ये दाखल

सोलापूर : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपाने सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी थेट भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. गणेश वानकर हे गेल्या २५ वर्षांपासून ठाकरे गटाच्या शिवसेनेत सक्रिय होते. पक्षाशी एकनिष्ठ असलेले वानकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली. प्रभाग क्रमांक ६ मधील ठाकरे गटाच्या चार उमेदवारांचे एबी फॉर्म वानकर यांच्याकडे होते. हे फॉर्म त्यांनी भरले की नाही, याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र, आज स्वतः वानकर यांनी खुलासा करत ठाकरे गटाचे अर्ज न भरता भाजपकडून अर्ज भरल्याची कबुली दिली.

या निर्णयाबाबत बोलताना गणेश वानकर म्हणाले, “गेली अनेक वर्षे आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यामुळे आमच्या प्रभागात अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत. मतदारसंघातील विकासासाठी निधीची मोठी गरज आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नव्हती, म्हणून भाजपकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.”

ते पुढे म्हणाले, “पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. नेता म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना आजही मानतो. मात्र विकासासाठी सत्तेत असलेल्या पक्षात जाणे गरजेचे वाटले. मला सर्वच पक्षांकडून ऑफर होती. जिल्हाप्रमुख म्हणून जो वर्ग माझ्यावर विश्वास ठेवतो, तो वर्ग आम्ही भाजपमध्ये विलीन केला आहे. भाजपच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.” या घडामोडीमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.