सोलापूर शहर झाले चकाचक
.jpeg)
सोलापूर, दि. १० -
स्मार्ट सिटी सोलापूर शहर सध्या चकाचक बनले आहे. महानगरपालिकेच्यावतीने दोन डिसेंबरपासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना सुखद धक्का बसला असून प्रमुख चौकांचे रूपडेच बदलले आहे.
१३ डिसेंबरपर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये शहरातील सुमारे ७९ मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. मनपाचे ४३७ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेसाठी आठ मुख्य आरोग्य निरीक्षक, ४९ आरोग्य निरीक्षक, ३८० स्वच्छता कर्मचारी भाग घेत आहेत. शांती चौक, जुना बोरामणी नाका, दयानंद महाविद्यालय परिसर, रूपाभवानी चौक, गुरूनानक चौक, अशोक चौक आदींसह अन्य भागातील रस्ते या मोहिमेमुळे उजळले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून काही रस्त्यांवर कचरा, प्लॅस्टिकचे ढीग, इतर वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसायच्या. यामुळे अनेक ठिकाणी
कचरा साचून अस्वच्छता निर्माण झाली होती. तसेच दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
दरम्यान, ही मोहीम हाती घेऊन महानगरपालिकेने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. प्रमुख रस्ते, तसेच झोपडपट्टी परिसरात हा उपक्रम राबविल्यात येत असल्याने शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड या मार्गावरून जडवाहतुकीची चोवीस तास रेलचेल असते. अवजड वाहने सतत ये-जा करत असल्याने रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धूळ साचले होते.
मात्र, सध्या वरील रस्त्यांवरील धूळ काढण्यात आली आहे.
याशिवाय रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी, दोन्ही बाजूकडील फूटपाथची स्वच्छता करण्यात आल्याने रस्त्यांना नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. जेसीवी, डंपर, कचरा संकलन वाहने, पाण्याचे टँकर अशी यंत्रणा या कामाला जुंपण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून समाधान व्यक्त
केले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक रस्त्यांवर फूटपाथची निर्मिती करण्यात आली नव्हती. त्यामुळे छोटे- मोठे अपघात सातत्याने घडायचे. मात्र, सध्या प्रमुख रस्त्यांवर फूटपाथ तयार करण्यात आल्याने वाहनधारकसुध्दा सुखावले असून त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.