सोलापूर-अक्कलकोट महामार्ग ठप्प – ट्रक-बस अपघातात अनेक जण जखमी

सोलापूर : पुण्यातून अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघातात सापडली. कर्जाळा (ता. सोलापूर) येथील वळसंग परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने अक्कलकोट व सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका जबरदस्त होता की, बसच्या डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. बसमध्ये ३० ते ३५ भाविक प्रवास करत होते. अपघात होताच परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रणात घेतली आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस अतिवेगात होती. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. सध्या पोलिस तपास आणि आपत्कालीन मदतकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.