लंडन साउथएन्ड विमानतळावर लहान प्रवासी विमानाचा स्फोटक अपघात

एसेक्स (ब्रिटन) : रविवारी ब्रिटनच्या लंडन साउथएन्ड विमानतळावर एक लहान प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले. या भीषण दुर्घटनेत मोठा स्फोट होऊन आकाशात प्रचंड धुराचे लोट उठले. घटनेनंतर लगेचच विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करून परिसर सील केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान Beechcraft B200 Super King Air प्रकाराचे होते आणि नेदरलँड्समधील खासगी विमानसेवा कंपनी झूश एव्हिएशन (Zeusch Aviation) तर्फे चालवले जात होते. हे विशेषत: वैद्यकीय रुग्णवाहतूकसाठी सुसज्ज विमान होते. अपघाताची माहिती एसेक्स पोलिसांना रविवारी दुपारी चारच्या सुमारास मिळाली. स्थानिक Rochford Hundred Golf Club आणि Westcliff Rugby Club या ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, विमानात किती लोक होते आणि जीवितहानी झाली का, याचीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आपत्कालीन सेवांनी तात्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी चार अॅम्ब्युलन्स, एक रॅपिड रिस्पॉन्स वाहन, चार हॅझार्डस एरिया रिस्पॉन्स युनिट्स, वरिष्ठ पॅरामेडिक्सची तीन गाड्या आणि एअर अॅम्ब्युलन्स पाठविल्या आहेत. विमानाच्या प्रवासाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने आधी अॅथन्स (ग्रीस) येथून उड्डाण करून पुला (क्रोएशिया) येथे थांबा घेतला आणि नंतर साउथएन्डला पोहोचले होते. पुढे नेदरलँड्सच्या लेलिस्टाड येथे परतीसाठी ते निघण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे लंडन साउथएन्ड विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आला असून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीमने तपास सुरू केला आहे. झूश एव्हिएशनने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करून म्हटले की, "आमचे संपूर्ण सहकार्य तपास यंत्रणांना आहे. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांच्या कुटुंबांसोबत आम्ही आहोत."