वैष्णवी हगवणे प्रकरणात कुटुंबातील सहा जणांना अटक

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर
येत असून, हगवणे कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल
केल्यानंतर आता त्यांना मदत करणाऱ्या चोंधे बंधूंवरही संशयाची सुई वळली आहे. या
प्रकरणात थार गाडी उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चोंधे बंधूंविरोधात चौकशी सुरू
असतानाच, सुयश चोंधे यांच्या पत्नीने त्यांच्या कुटुंबावर
खळबळजनक आरोप केले आहेत. सुयशच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिचा दीर वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सतत छळ करत होता आणि या त्रासाला
कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती, परंतु त्यावर
कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांनी आधीच चोंधे बंधूंविरोधात बावधन पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या हगवणे
कुटुंबाला मदत केल्याचा आरोप चोंधे बंधूंवर आहे. सुयशच्या पत्नीच्या तक्रारीनुसार,
तिच्या सासूने काळी जादू केली, तर नवऱ्याने
अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. नवरा आणि दीर सासूसमोर गांजाचे
सेवन करत असल्याचेही आरोप तिने केले आहेत. लग्नात दिलेल्या हुंड्यानंतरही पैशांची
मागणी सुरूच होती आणि त्यात मारहाणीचाही सामना करावा लागल्याचे तिने सांगितले आहे.
सध्या पोलिस चोंधे बंधूंविरोधात सुरू असलेली चौकशी अधिक गडद होत चालली असून,
या प्रकरणातील राजकीय व सामाजिक घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता
आहे.