कोल्हापुरात महिला सुधारगृहातील सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला
सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे शहरात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व सहा महिलांना ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी काही गुन्ह्यांखाली
ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना महिला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून जामीन न मिळाल्याने आणि
सुधारगृहातील परिस्थितीमुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. याच
कारणामुळे त्यांनी हाताची नस कापून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेची
माहिती मिळताच महिला सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून जखमी
नृत्यांगनांना छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल केलं, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे
रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे महिला सुधारगृहातील सुरक्षेवर आणि
देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास
सुरू केला असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारणांचा शोध
घेत आहेत. एका नृत्यांगनेच्या पतीने सांगितलं की, “दोन
महिन्यांपासून त्या सुधारगृहात आहेत. त्यांना जामीन मिळत नसल्यामुळे त्या खूप
तणावात होत्या. याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं.” या घटनेमुळे
कोल्हापूरमधील समाजात खळबळ माजली असून, सुधारगृहातील
महिलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरु आहे.