दिवाळीत श्री वटवृक्ष मंदिर भाविकांसाठी २० तास खुले; गर्दीच्या काळात अभिषेक तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय

अक्कलकोट : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये राज्यभरातून अक्कलकोटला मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ वाढतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा  लाभ घेण्यासाठी येणाऱ्या या भाविकांना अखंड आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात हे देवस्थान दररोज तब्बल २० तास खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

महेश इंगळे पुढे म्हणाले की,दिवाळी हा आनंद, एकत्र येणे आणि सत्कर्माचा काळ आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर जातो. पण या उत्सव काळात पुणे, मुंबईसह देशभरातून स्वामीभक्त आपला परिवार घेऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात. त्यांच्या भक्तीभावाला आणि सोयीसुविधांना प्राधान्य देत मंदीर समितीने दर्शनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गुरूवार, १६ ऑक्टोबरपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत देवस्थान सकाळी पहाटे ३ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत खुले राहील. या काळात भाविकांना अखंड स्वामीदर्शनाची संधी उपलब्ध असेल. गर्दी वाढल्यास भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी मंदीर समिती आणि पुरोहित वर्गाने भाविकांच्या वतीने होणारे व्यक्तिगत अभिषेक तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. त्याऐवजी श्री स्वामी समर्थांचे सामूहिक अभिषेक ठराविक वेळेत बॅच प्रणालीने करण्यात येतील.  इंगळे यांनी पुढे सांगितले की, भाविकांच्या सोईसाठी देवस्थान परिसरातील सर्व व्यवस्था, दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि स्वयंसेवकांची नियोजनबद्ध नेमणूक याबाबत समितीने सविस्तर नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व स्वामीभक्तांनी संयम आणि सहकार्य दाखवून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. दिवाळीच्या उत्सवी वातावरणात भक्ती,श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचा हा उपक्रम भाविकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे.श्री स्वामी समर्थ  या जयघोषात न्हाऊन निघालेल्या अक्कलकोटमध्ये या काळात भक्तिभावाचे वातावरण अधिक तेजाळणार आहे.