श्री गेनसिध्द मंदिर सुवर्ण कळसारोहण लक्ष लक्ष डोळ्यांनी अनुभवला

कुंभारी: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिध्द महाराज मंदिरावरील सुवर्ण कळसारोहण व विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त गुरुवारी आयोजित केलेल्या 51 पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व असा सोहळा न भूतो अशा उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांकडून श्री गेनसिध्द महाराजांचा जयघोष करीत भंडार्‍याची मुक्तपणे उधळण करण्यात आली. श्री गेनसिध्द महाराज मंदिरावरील सुवर्ण कळसारोहण व विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मंगळवारपासून ऐतिहासिक असा सोहळा सुरू असून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक श्री गेनसिध्द महाराजांचे दर्शन घेत आहेत. मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून तर महाप्रसादासाठीही भाविकांच्या रांगा लागत आहेत. गुरुवारी पार पडलेल्या पालखी भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून पालख्या कुंभारीत दाखल झाल्या होत्या. सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी टोल नाक्याशेजारील भव्य मैदानात या पालख्यांच्या भेटीचा अपूर्व सोहळा पार पडला. त्यानंतर मिरवणुकीने सर्व पालख्या मंदिरात नेण्यात आल्या. यावेळी श्री गेनसिध्द मंदिराचे गदगी पुजारी यांच्या हस्ते पालखीपूजन करून स्वागत करण्यात आले. पालखी भेटीच्या या सोहळ्यासाठी कुंभारी श्री गेनसिध्द देवासह मकणापूर श्री गुरू सोमलिंग, जालगेरी श्री अमोगसिध्द, विटे श्री महासिध्द, तापसी श्री करणी मलकारसिध्द, अथणी श्री मळगालसिध्द, बडची श्री नागप्पवडीया, मरबद श्री योगीवडीया, बबलाद श्री कोंत्यव्वादेवी, इंदापूर भावडी श्री बिळोगसिध्द, व्होन्नमोळे श्री ओगसिध्द, आचेगाव श्री शिलीसिध्द, तिकुंडी श्री मुत्यप्पा वडीया, हत्तुर श्री ओग्यण्णामुत्या, कौलगुड्ड श्री करी ओगसिध्द, कुंचनूर श्री मादण्णा, इंगळगी श्री इरसिध्द, बेवनूर श्री अमोगसिध्द, गुणदाळ श्री सौभाग्यसिध्द, जकनूर श्री ओगसिध्द, बिदरी श्री मळीमल्लप्पा वडीया, केंपवाड श्री हिरी मलकारसिध्द, निंबाळ श्री करणीसिध्द, देवर नावदगी श्री नागसिध्द, अज्जनगी श्री सिध्दराय मुत्या, कंबोगी श्री अमण्णवडीया, हुक्कुंडी श्री सिध्दराया, जंगलगी श्री अमोगसिध्द, सातलगाव श्री मलकारसिध्द, हालचिंचोळी श्री अमोगसिध्द, सोरेगाव श्री मलकारसिध्द, सातखेड श्री अमरगोंडा, जिगजेणी श्री कंठीसिध्द, मद्रे श्री मुत्यप्पा वडीया, मंद्रूप श्री भंडी मलकारसिध्द, चिक्कलगी श्री अमोगसिध्द, सुसलाद श्री मुत्यप्पवडीया, सलगर श्री मदप्पवडीया, बोर्‍याळ श्री पिंडवडीया, सिध्दापूर श्री ओगसिध्द, मंद्रूप श्री मळगालसिध्द आदी देवांच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या. पालखी भेटीच्या सोहळ्यास उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून प्रत्येक घरातून लक्ष भोजनासाठी 100 भाकरी, शंभर धपाटे, 100 पोळ्या मंदिरात आणल्या होत्या. पालखी सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मानकरी शिरीष पाटील, श्री गेनसिध्द देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गेनसिध्द गुंडे, सचिव मळसिध्द गुंडे, संजय पाटील, रामचंद्र होनराव, गजानन होनराव, गेनसिध्द भोरगुंडे, प्रकाश करपे, अमोगी इमडे, राजकुमार पाटील, श्रीशैल जडगे, रमेश पुजारी, भुताळी कळकिळे, माजी उपसरपंच गेनसिध्द बिराजदार, सिध्दाराम खसगे, गणेश बिराजदार, भीमशा कळकिळे, नागराज गुंडे, सण्णू पुजारी आदींनी परिश्रम घेतले.