श्रेयस अय्यरला सामन्यात गंभीर दुखापत; आयसीयूमध्ये दाखल झाल्यानंतर दिली प्रकृतीची माहिती
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात गंभीर जखमी झाला. सामना सुरू असताना अलेक्स
कॅरीचा झेल घेताना अय्यरच्या बरगड्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील
रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत त्याच्या छाती
आणि पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला काही काळासाठी आयसीयूमध्ये
ठेवण्यात आलं. सुदैवाने आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
श्रेयस अय्यरची सोशल मीडिया पोस्ट
श्रेयसने एक्स (Twitter) वर पोस्ट करत लिहिलं – “माझी प्रकृती आता सुधारत आहे. दिवसेंदिवस मी अधिक तंदुरूस्त होत आहे. तुम्हा सर्वांनी दाखवलेला पाठिंबा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना याने मी भारावून गेलो आहे. माझ्या चाहत्यांचे प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे.” अय्यरने चाहत्यांनी दाखवलेल्या काळजीबद्दल आणि सदिच्छांबद्दल आभार मानले आहेत.
दुखापत कशी झाली?
ऑस्ट्रेलियन डावाच्या 34व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना श्रेयस मागे धावत गेला आणि त्या वेळी त्याचा तोल गेला. यामुळे त्याच्या बरगड्यांना जबर धक्का बसला. तो मैदानावरच वेदनेने विव्हळत बसला होता. वैद्यकीय पथकाने त्याला तातडीने मैदानाबाहेर नेलं आणि उपचार सुरू केले. सध्या श्रेयस अय्यर डॉक्टरांच्या देखरेखीत असून प्रकृती स्थिर आहे.