श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर – १९७५ बॅच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी जिवंत आणि ताज्या केल्या, माजी विद्यार्थी मेळावा संपन्न- श्रीपूर तालुका माळशिरस येथील नामवंत असणारी शाळा श्री चंद्रशेखर विद्यालय, १९७५ बॅच, दहावीचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा शाळेमध्ये आनंदी उत्साही वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला. सकाळी सर्व 65 वर्षे पूर्ण केलेल्या त्याकाळच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे थाटामाटात आगमन झाले. स्थानिक विद्यार्थ्यांनी, मित्रांनी त्यांचे स्वागत केले, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ओळखपत्र, रांगेत वर्गात प्रवेश ठरले खासाकर्षण. घंटा वाजली, प्रार्थना देखील झाली. रांगेत ओळीत वर्गामध्ये जाण्याची मजा तब्बल पन्नास वर्षानंतर परत एकदा घेतली आणि आपल्या वर्गात प्रवेश केला. जुन्या बाकावरील आठवणी ,वर्गातील गमती जमती, यांनी एकमेकांना ओळखीचे किस्से सांगत, पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी दहावीला शिकवणारे शिक्षक ग.बा.कुलकर्णी सर, विद्यमान प्राचार्य पांडुरंग बनसोडे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, कलाशिक्षक मोहन भगत, लेखनिक अनंत कुलकर्णी सर व सर्व मान्यवर आणि  विद्यार्थिनी विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात  आला. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मधून विनया देसाई यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. सर्व मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याच बॅचचे विद्यार्थी कार्यकारी संचालक असणारे संदीप देशपांडे यांना साखर क्षेत्रातला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार देखील करण्यात आला.  प्रत्येक माजी विद्यार्थ्याला भेटवस्तू देखील देण्यात आली.

दुपारच्या जेवणाचा आस्वाद सर्वांनी हसत खेळत गमतीजमती करत घेतला. दुपारी संगीत मैफिल आणि आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.  चार वाजता सर्वांनी एकमेकाला निरोप देत या मेळाव्याचे आनंदी टॉनिक पुढील काही वर्षांसाठी आठवणी म्हणून घेऊन गेले.