धुळे बाजारपेठेतील दुकानांना आग

धुळे : धुळे शहरातील पाच कंदील चौकातील मनपाच्या मार्केटला लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाली. ही आग मध्यरात्रीनंतर लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण करण्यात आले असून या आगीत पाचही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे शहरातील पाच कंदील चौकामध्ये कापड, धान्य, फळ आणि भाजी विक्रेत्यांसाठी वेगवेगळी मार्केट बनवण्यात आली आहे. हे मार्केट जीर्ण स्वरूपात आहे त्यामुळे आग लागण्याच्या घटना येथील नित्याची बाब बनली आहे. यातील भाजी मार्केट मधील दुकानांना भीषण आग लागली. या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य तसेच अन्य वस्तूंची विक्री केली जात होती. मध्यरात्री उशिरा या दुकानामधून आग येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही माहिती कळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने हालचाली करत आग विझवण्यासाठी धावपळ केली. पहाटे ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी या दुकानांची पाहणी केली असून शासनाने तातडीने आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. या आगीमध्ये राणा, राजकुमार अग्रवाल, संतोष अग्रवाल, विलास लवांदे आणि मोदी भांडार या दुकानांचे नुकसान झाले आहे .प्राथमिक स्तरावर दहा ते पंधरा लाखाचा नुकसानीचा अंदाज असून पूर्ण पंचनामा झाल्यानंतर हे नुकसान वाढेल, अशी शक्यता कोटेचा यांनी व्यक्त केली आहे. चैनी रोडवर किरकोळ व्यापार करणारे अनेक व्यापारी असून या आगीमुळे पाचही व्यावसायिकांच्या दुकानांची राख रांगोळी झाली आहे.