मंगळवेढ्यात धक्कादायक प्रकार – जळून मृत घोषित केलेली महिला प्रियकरासोबत जिवंत सापडली

सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका चक्रावून
टाकणाऱ्या प्रकरणामुळे पोलिसांसह नागरिकही हादरले आहेत. पत्नीला जाळून ठार
मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक झाली होती. मात्र, काही
दिवसांनी हीच महिला साताऱ्यात एका प्रियकरासोबत जिवंत आढळली. ही घटना पंढरपूर येथील दशरथ दांडगे
यांच्या मुलगी किरण हिची आहे. किरणचा विवाह नागेश सावंत याच्याशी झाला होता.
दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे.
प्रकरण कसं उलगडलं?
१४ जुलै रोजी पहाटे नागेश सावंत यांच्या नातेवाइकांनी किरणच्या
वडिलांना फोन करून किरणने स्वतःला पेटवून घेतल्याची माहिती दिली. कुटुंबीय धाव घेत
असताना घराजवळ गवताच्या गंजीत एक जळालेला मृतदेह सापडला. पती नागेशने तो किरणचाच
असल्याचा दावा केला.मात्र माहेरच्या मंडळींना या घटनेत
काही तरी संशयास्पद वाटले. त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. तपास सुरू
होताच पोलिसांनी नागेश सावंत याला अटक केली.
पण तपासात मोठा ट्विस्ट
पुढील तपासात धक्कादायक सत्य उघड झाले. जिच्या मृत्यूचा दावा केला
जात होता, ती किरण साताऱ्यात एका पुरुषासोबत जिवंत सापडली.
तो व्यक्ती तिचा प्रियकर असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर घराजवळ सापडलेल्या
जळालेल्या मृतदेहाचे गूढ आणखीनच वाढले आहे. तो मृतदेह नेमका कुणाचा? याचा शोध सुरू असून पोलिसांनी
शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे. अहवाल आल्यानंतर अनेक प्रश्नांची
उत्तरे मिळणार आहेत.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा अधिक सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. मृतदेह ओळख
पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात चांगलीच चर्चा रंगली
असून, नागरिकांमध्ये कुतूहल आणि धक्का व्यक्त होत आहे.