अमरावतीत धक्कादायक प्रकरण : १० वर्षांच्या मुलीच्या पोटातून अर्धा किलो केसांचा गोळा काढला.

अमरावती : - अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका 10
वर्षीय मुलीच्या पोटातून अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा काढण्यात
आला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तिला अपचन, उलट्या,
भूक मंदावणे आणि पोटदुखी यांचा तीव्र त्रास होत होता. विविध
डॉक्टरांकडून उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता. शेवटी अमरावतीतील
बालशल्यचिकित्सकांनी तपासणी करून धक्कादायक निदान केले – तिच्या पोटात केसांचा
मोठा गोळा जमलेला होता. ‘ट्रायकोफॅजिया’ या मानसिक विकारामुळे तिला स्वतःचे केस
खाण्याची सवय लागली होती. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून केसांचा अर्धा किलो
वजनाचा गोळा काढून तिच्यावर यशस्वी उपचार केले. यापूर्वीही लखनौ व वसईत अशा घटना
घडल्या आहेत, ज्या प्रकरणांमध्ये 2 किलोपर्यंत
केसांचे गोळे सर्जरीद्वारे काढण्यात आले होते. ट्रायकोफॅजिया व ट्रायकोबेझार हे
विकार दुर्मीळ असले तरी लक्षणांवर लक्ष दिल्यास वेळेवर उपचार शक्य आहे. मानसोपचार
व सल्ल्याद्वारे रुग्णाला ही सवय सुटण्यास मदत होते.