ठाकरे गटाला धक्का : तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

मुंबई : उत्तर मुंबईतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला असून, स्थानिक नेतृत्वाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे आणि नाराजीतून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. राजीनाम्यात काय आहे? “मी तेजस्वी घोसाळकर, महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.”

मातोश्रीवरून संपर्क :
राजीनाम्यानंतर मातोश्रीवरून तेजस्वी घोसाळकर यांना तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यांच्या नाराजीचे कारण जाणून घेण्यासाठी ठाकरे गटातील वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.

पार्श्वभूमी : अभिषेक घोसाळकर यांची हत्या

2024 मध्ये बोरीवली परिसरात फेसबुक लाईव्ह दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली होती. घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे दीर्घकाळापासून जवळचे संबंध असून, ही घटना संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय बनली होती.

तेजस्वी या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. विनोद घोसाळकर हे दहिसरमधून शिवसेनेचे आमदार होते.

धमकीचा प्रकारही समोर

गेल्या महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंदअसा धमकीचा मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली होती.