चाकूरकरांनी देश विकासात योगदान दिले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांचे प्रतिपादन
लातूर: शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशाच्या आणि समाजाच्या
विकासात मोलाचे योगदान दिले आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा खूप
स्नेह होता. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी
त्यांना केंद्रात गृहमंत्री केले. यावरून गांधी कुटुंबाचे शिवराज पाटील चाकूरकर
यांच्यावरील प्रेम स्पष्ट होते, असे प्रतिपादन काँग्रेसचे
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. माजी केंद्रीय गृहमंत्री
शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर शनिवारी दुपारी लातूर शहराजवळील त्यांच्या शेतात
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी खर्गे बोलत होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम
बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ, खासदार अशोक चव्हाण, खासदार
रजनीताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा, कर्नाटकचे
मंत्री ईश्वर खंड्रे, आमदार यशवंत गौडा यांच्यासह अनेक माजी
केंद्रीय मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.
यावेळी खर्गे म्हणाले, शिवराज पाटील चाकूरकर हे आमचे स्नेही आणि
वरिष्ठ मित्र होते. एक चांगल्या स्वभावाचे वरिष्ठ मित्र आज आपल्यात नाहीत. त्यांनी
राजकारणात विविध पदांवर कार्य केले. त्यांची कारकीर्द कायम सकारात्मक आणि उत्तम
राहिली आहे. आमचे एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व आज आमच्यातून गेले याचे दुःख आहे.
यावेळी अन्य मान्यवरांनीही शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जीवन कार्याला उजाळा
दिला.