शिवसेना ठाकरे पक्षाला संभाजीनगरात घरघर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहर • आणि जिल्ह्यामध्ये पक्षफुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पक्षातील माजी महापौर, नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाला लागलेल्या या गळतीचे रूपांतर भगदाडात होण्याची चिन्हे असताना पक्ष टिकवून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि दुसरे नेते अंबादास दानवे यांनी मात्र सध्या बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सलग दोन लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे पक्षामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच दानवे खैरे यांच्या वादाने पक्षाची पुरती वाट लागल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.

खेरे-दानवे यांच्यातील वर्चस्वाची लढाई ही तशी गेल्या अनेक वर्षांपूर्वीची. मात्र शिवसेना एकसंध असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम आतापर्यंत जाणवला नव्हता. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत झाली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गमावल्यानंतर आता पक्षातील एक एक नेते, पदाधिकारी, सत्ताधारी शिवसेनेची पालखी वाहण्याच्या तयारीत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरानंतर शिवसेनेला बूस्ट मिळाला तो छत्रपती संभाजीनगरमधून, पक्षाची शाखा स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. हिंदुत्ववादी विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर भूमिकेला संभाजीनगरकरांनी भरभरून साथ दिली. महापालिकेत पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विजयी सभेत लोटांगण घालत संभाजीनगरकरांचे आभार मानले होते. त्यानंतर प्रत्येक जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरवर आपले विशेष प्रेम असल्याचे सांगितले होते. आज मात्र त्यांच्या या आवडत्या संभाजीनगर शहरात पक्षाची दुरवस्था होत आहे. शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हाती नेतृत्व गेल्यानंतर खैरे आणि दानवे या दोघांच्याही समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत धोक्याची घंटा वाजवली होती. मात्र एकमेकांवर कुरघोडी आणि वर्चस्वाच्या लढाईतून खैरे दानवे यांनी पक्षाची होणारी वाईट अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहिली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची सावली म्हणून वावरणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले व त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला. खैरे यांनी त्यांच्यावर टीका केली असली तरी घोडेले यांचा हा निर्णय पक्षाच्या नेत्यांना माहीत नव्हता, असे म्हणता येणार नाही. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भोवतीच संशयाचे जाळे असल्यामुळे ते कुणालाही रोखण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसते. तर पक्ष फुटीचे खापर अंबादास दानवे यांच्या माथी फोडता येईल या विचारातून चंद्रकांत खैरे हे देखील पक्षाच्या गळतीकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. घोडेले दाम्पत्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेचे दहा ते बारा माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. माजी महापौर विकास जैन, किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले या शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या नेत्यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेची साथ सोडल्याने पक्ष निम्मा रिकामा झाल्याचे चित्र आहे. अशावेळी महापालिकेवर असलेली सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशी टिकवणार? असा सवाल केला जात आहे.