शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरें यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिवादन

मुंबई:- हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब
ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना
अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली
वाहिली आहे. आज 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय आणि
सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. नरेंद्र मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या
जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. समाज कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती
असलेल्या बाळासाहेबांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि
त्यांचे स्मरण केले जाते. बाळासाहेबांनी आपल्या मूळ विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची
तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान
आहे.” महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा
लढवय्या नेता अशी बाळासाहबे ठाकरे यांची ख्याती होती. मराठी माणसाच्या न्याय
हक्कासाठी त्यांनी कोणतीही पर्वा न करता आपली परखड मतं मांडली.