"बाळ"नावाचा बाप माणूस..!

"बाळ"नावाचा बाप माणूस..! मराठी माणसांच्या हितासाठी झटणारा सच्चा राजकारणी! बाळासाहेब यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. मुळात मिश्किल स्वभाव त्याचबरोबर व्यंगचित्र रेखाटण्याची आवड म्हणून बाळासाहेबांनी इंग्रजी वृत्तपत्र फ्री प्रेस जनरल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. काही काळा नोकरी करून स्वतःचे साप्ताहिक सुरू करण्याचे ठरवले. वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीत्यांच्या कल्पनेतून साप्ताहिकाचे नाव "मार्मिक" हे सुचविले आणि ऑगस्ट 1960 रोजी पहिले साप्ताहिक प्रकाशित झाले. हे मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी या साप्ताहिकेतून वाचा फोडली. समस्त महाराष्ट्रभर "मार्मिक" पोहोचले. बाळासाहेबांचे व्यंगचित्रं विरोधकांचे अचूक वेध घ्यायचे यातून त्यांना राजकारणात खूप फायदा झाला.अतिशय प्रखर लिखाण कौशल्यामुळे राजकीय क्षेत्रात झापाट्याने लोकप्रियता मिळाली.


 छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन 19 जून 1966 रोजी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. वयाच्या 40 व्या वर्षी या "उमद्या तरुणांने"मराठी तरुणांच्या समस्या लक्षात घेतल्या. प्रथम व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेब प्रत्येकांच्या मनामनात जाऊन पोहोचले होतेच त्याचबरोबर प्रखर, निर्भीड, मराठी तरुणांच्या हिताचे विचार समस्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी पक्ष स्थापनेनंतर केवळ चार महिने 11 दिवसात प्रचंड लोकप्रियतेतून पाच लाख तरुणांसमोर शिवाजी पार्क या मैदानावर घेतला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो.....! या क्रांतिकारी व प्रेरणादायी भाषणाच्या सुरुवातीने मराठी बांधवांसोबत सुसंवाद साधत तब्बल 46 वर्ष शिवाजी पार्क (शिवतीर्थ )मैदान लाखोंच्या संख्येने गाजवले. या मेळाव्यातून बाळासाहेबांनी समस्त मराठी जनतेच्या मनात घर केले व लाखो मराठी तरुण शिवसैनिक बाळासाहेबांचे विचार व भाषणांच्या प्रेमात पडले. गावोगावी शिवसेनेच्या शाखेचे फलक झळकले .मराठी माणूस व बाळासाहेबांच्या विचारांची नाळ जुळली. शिवसेनेला राजकीय पक्षांच्या दर्जा प्राप्त झाल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत,नगरपालिका महानगरपालिका, जिल्हा परिषद येथे सत्ता स्थापन केली. शिवसेना व भाजपा पक्षाचे ध्येय धोरणे व विचार जुळल्यामुळे प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून शिवसेना व भाजपा पक्षांची युती होऊन 1995 साली शिवसेना भाजपने सत्ता काबीज करून मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले.


 बाळासाहेबांना व्यंगचित्राबरोबर वडिलांप्रमाणे लिखाणाची ही आवड असल्याने त्यांनी 1989 दै."सामना" हे वृत्तपत्र चालू केले. सामनामध्ये बाळासाहेबांचे संपादकीय अग्रलेख असायचे यामध्ये विरोधकांचे अक्षरशः धिंडोरे उडवले. बाळासाहेब सभेसाठी गेल्यावर भाषणासाठी नुसते उभे राहिले तर, सुरुवातीचे पाच मिनिटे केवळ टाळ्यांचा गडगडाट आणि माझ्या तमाम......! म्हटल्याबरोबर तरुणाईचा उत्साह व धैर्याने छाती फुलून यायची. अंगावरील पांढरे शुभ्र कपडे, गळ्यातील भगवा रुमाल व हातात रुद्राक्षाची माळ हा त्यांचा पेहेराव व विशेषता...! जेव्हा बाळासाहेब दोन्ही हात उंचावून मंचकावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे पाठमोरे शरीर लाखोंच्या गर्दीसमोर खूप भारदस्त, रुबाबदार व पर्वतासारखं भासायचं. रोखठोक भाषणातून भेडसावडणाऱ्या परिणामांची पर्वा न करता न्यायासाठी लढणारं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे जणू ढाण्या वाघच....! बाळासाहेबांच्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त हिंदुस्थानात एक वेगळा दबदबा प्रस्थापित केला होता.


 बाळासाहेब हे हिंदुत्व विचारसरणीचे नक्कीच होते, मात्र मुस्लिम विरोधी नव्हते. देश विघातक कृत्य घडवणाऱ्या धर्मांधाना या देशात राहण्याचा अधिकार नाही, तो कुठल्याही जाती - धर्मांचा असो त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्यांच्या राहणीमान व जीवनशैलीमुळे काहींना वाटायचे की बाळासाहेब मुस्लिम विरोधी होते परंतु, भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणताही प्रकारचा विरोध नाही, असे त्यांचे विचार होते,अन हे तेवढेच खरे आहे. बाळासाहेबांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुस्लिम बांधवांनी ते मान्य ही केले. समस्त महाराष्ट्रभर बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन हजारो, लाखो मुस्लिम शिवसैनिक त्या काळातही होते आणि आजही आहेत कित्येक मुस्लिम सरपंच, नगरसेवक, आमदार अजूनही कार्यरत आहेत अर्थात बाळासाहेब सर्व समावेशक होते. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेत 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या "ठाकरे" सिनेमामध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी साकारली हे जिवंत उदाहरण...!


 बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका निभवतांना कित्येक आमदार,खासदार त्यांच्या राजकीय आखाड्यामध्ये तयार झाले.परंतु त्यांनी एकदाही पद न भूषविता, बाळासाहेब! एकमेव राजकारणी असे कि, सत्तेत असणाऱ्या व विरोधकांनाही नियंत्रणात ठेवणारे "रिमोट कंट्रोल" होते. स्वतः बाळासाहेब भेटायला कोणाकडेच गेले नाही याउलट त्यांनाच भेटण्यासाठीच गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चे नेते व राजकारणी आले,मग ते कुठल्याही पक्षाचे असो..! हे त्यांच्या जीवनातील खास वैशिष्ट्य..! शब्दांना पाळणारे, मतांशी ठाम असणारे बाळासाहेब जे केले ते अगदी निर्भीडपणे मान्य करायचे. जीवनात कधीच दुटप्पी भूमिका घेतली नाही. मराठी माणसांच्या हितासाठी कायम ठाम असणारे बाळासाहेब दिलेला शब्द कधीच मोडत नव्हते. तरुणांसाठी मार्गदर्शक होते. बाळासाहेब तरुणांना नेहमी म्हणायचे, नोकऱ्या नाही म्हणून खचून जाऊ नका,व्यवसाय करा. व्यवसायाची लाज बाळगू नका.परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन अनेक उद्योगधंदे करतात.पोट भरतात. तुम्ही सुद्धा जातीच्या पलीकडे जाऊन जो व्यवसाय आवडेल तो व्यवसाय करा. बदलत्या काळाला सामोरे जा.असे युवकांना मार्गदर्शन केले. परकीय सण,व "डे" जसे की, "व्हॅलेंटाईन डे" सारख्या भारतीय संस्कृतीला बट्टा लावणाऱ्या "डे"चा त्यांनी प्रखर विरोध केला. 


असा या स्पष्टोक्ता ,निर्भीड,सच्चा राजकारणी, समाजसेवक, संपादक,व्यंगचित्रकार, मराठी माणसांचा कैवारी, ढाण्या वाघाने करोडो हिंदूंच्या मनात घर करून, हृदयावर अधिराज्य गाजवले व "हिंदूहृदयसम्राट" झाला. करोडोंच्या मनात हिंदुत्वाची ओळखनिर्माण करून 17 नोव्हेंबर 2012 ला वयाच्या 86 व्या वर्षी "बाळ" नावाचा बापमाणूस...! करोडो मराठी बांधवाना पोरका करून गेला. जयंतीनिमित्त हिंदुहृदयसम्राट यांना विनम्र अभिवादन....!


श्री विनोद शेनफड जाधव