हिरजमध्ये पक्षी निरीक्षणात आढळला शेंडीवाला कोतवाल

सोलापूर, दि. १२-

वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांच्या हिरज परिसरातील पक्षी निरीक्षणाच्यावेळी घनदाट जंगलात अधिवास असलेला व दुर्मीळ प्रजातीचा शेंडीवाला कोतवाल पक्षी दृष्टीस पडला. संतोष धाकपाडे आणि सुरेश क्षीरसागर हे पक्षी निरीक्षणाला नुकतेच हिरज परिसरात गेले होते. त्यांना एका झाडावरती एक दुर्मीळ प्रजातीचा पक्षी दिसून आला. वुलवुल पक्ष्यापेक्षा थोडा मोठा आणि कोकिळेपेक्षा थोडा लहान असा एक पक्षी त्यांना दिसला. त्या पक्ष्याची हालचाल थोडी वेगळीच होती. त्यामुळे धाकपाडे आणि क्षीरसागर या दोघांनी त्या पक्ष्याचे चांगले निरीक्षण केले. त्यांना हा पक्षी जरा वेगळा वाटला म्हणून नीट निरीक्षण केले असता तो पक्षी शेंडीवाला कोतवाल असल्याचे समजले. या अगोदर हा शेंडीवाला कोतवाल २०२१ मध्ये स्मृती उद्यानात दिसला होता. त्यावेळी सोलापूरचे पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ, रत्नाकर हिरेमठ, अभिषेक कुलकर्णी, महादेव डोंगरे आणि सूरज धाकपाडे यांनी तो पाहिलेला होता. सोलापुरात आतापर्यंत कोतवालच्या चार उपप्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये काळा कोतवाल, पांढऱ्या छातीचा कोतवाल, राखाडी कोतवाल आणि शेंडीवाला कोतवाल याचा समावेश आहे. शेंडीवाला कोतवाल हा पक्षी दाट जंगलात आढळतो. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो मध्यम आकाराचा असून त्याच्या डोक्यावर केसासारखी दिसणारी लांव पिसे असतात. ही पिसे सहजपणे दिसून येत नाहीत. चोच लांव, जाड आणि थोडीशी वाक असते. शेपटीच्या टोकाची पिसे वरच्या वाजूला अधिक वळलेली, रंगाने काळा असून शरीरावर प्रकाश पडल्यानंतर चमकदार उठून दिसतो..