शेखर कपूर, पंकज उधास यांना पद्मभूषण; चित्तमपल्ली, चैत्राम पवार यांना पद्मश्री

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्म पुरस्कारां’चे
वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पार पडले.
यामध्ये महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय
कार्यासाठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या भव्य समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह व अन्य मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित होते. यंदा पुरस्कार वितरण
दोन टप्प्यांत होत असून आज पहिल्या टप्प्यात ७१ जणांना गौरवण्यात आले. यामध्ये ४
पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि ५७ पद्मश्री पुरस्कारांचा
समावेश आहे.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित:
- शेखर कपूर: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट
दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी
पद्मभूषण प्रदान करण्यात आला.
- पंकज उधास (मरणोत्तर): आपल्या सुरेल गझलांनी रसिकांच्या
हृदयावर राज्य करणारे पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषणने सन्मानित करण्यात
आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित:
- अरुंधती भट्टाचार्य (बँकिंग क्षेत्र)
- डॉ. पवनकुमार गोएंका (उद्योग क्षेत्र)
- मारुती चित्तमपल्ली (वन्यजीव अभ्यासक व
लेखक)
- वासुदेव कामथ (चित्रकला)
- जसपिंदर नरुला (संगीत)
- पं. रानेद्र भानू मजुमदार (बांसुरी वादन)
- चैत्राम पवार (पर्यावरण संवर्धन)
या सर्व मान्यवरांच्या कार्याने त्यांच्या
संबंधित क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. उर्वरित ६८ पुरस्कारांचे वितरण
पुढील महिन्यात होणार आहे. यंदा एकूण १३९ व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात
आले आहेत.