शार्दुल ठाकूर चमकला

मुंबई : कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिल सारखे स्टार खेळाडू रणजीच्या मैदानावर अपयशी ठरत असताना शार्दुल ठाकूर चमकला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि  अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या त्याच्या उत्कृष्ठ खेळीमुळे  चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजीने कहर केला. शार्दुलने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. आता त्याने गोंलदाजीमध्येही कहर केला आहे. ३० जानेवारी रोजी सुरू झालेल्या मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली आणि त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे मेघालय संघ पूर्णपणे गारद झाला आहे. त्याचा अर्धा संघ फक्त 2 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी अलेल्या संगमा आणि आकाश चौधरी यांनी डाव सांभाळला.

हॅटट्रिक घेणारा मुंबईचा पाचवा गोलंदाज

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून हॅटट्रिक घेणारा शार्दुल ठाकूर हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी, मुंबईच्या ४ गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. ज्याची सुरुवात जहांगीर खोतने केली होती. १९४३-४४ च्या हंगामात त्याने बडोद्याविरुद्ध ही कामगिरी केली. त्यांच्यानंतर, उमेश नारायण कुलकर्णीने १९६४-६५ च्या हंगामात गुजरातविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि अब्दुल इस्माइलने १९७३-७४ च्या हंगामात सौराष्ट्रविरुद्ध हॅटट्रिक घेतली. त्यानंतर रॉयस्टन डायसने २०२३-२४ हंगामात बिहारविरुद्ध हा पराक्रम केला. आता शार्दुल ठाकूरने मेघालयविरुद्ध त्याची पुनरावृत्ती केली आहे.