सुनेत्रा पवार शपथ घेणार आहे हे मला माहीत नाही.. पत्रकार परिषदेत शरद पवारांचे मोठे खुलासे
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असताना आणि
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची जोरदार चर्चा रंगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर आपली
पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी
या निर्णयाबाबत अजित पवार गटापासून स्पष्ट अंतर राखले.
“हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय”
पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विचारले
असता शरद पवार म्हणाले,
“सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला काहीच माहिती नाही. त्यांच्या
पक्षाने तो निर्णय घेतलेला दिसतोय. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न
आहे.” ते पुढे म्हणाले, “अशा चर्चा इथे होत नाहीत. ही चर्चा
मी मुंबईत झाल्याचे ऐकले आहे. सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याचे वाचनात आले आहे.
मात्र शपथविधी आहे की नाही, याची मला माहिती नाही.”
“कोणीतरी पुढे यायलाच हवं”
शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “जे गेले आहेत त्यांना परत आणता येत नाही. अशा परिस्थितीत कोणीतरी जबाबदारी
घेण्यासाठी पुढे येत असेल, तर त्यातून आत्मविश्वास मिळतो.
पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे दिलेले दिसते.”
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेत खंड
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबत
बोलताना शरद पवार म्हणाले,
“प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. काय करायचं आहे
ते त्यांनी ठरवलं आहे. यावर मी भाष्य करणार नाही. अजित पवार आणि जयंत पाटील या
एकत्र येण्याबाबत बैठका घेत होते. मात्र आता या प्रक्रियेत खंड पडेल, असं चित्र दिसत आहे.”
अजित पवारांचे जाणे हा मोठा आघात
अजित पवार यांच्या नेतृत्वावर बोलताना शरद पवार भावुक
झाले. ते म्हणाले,
“अजित हा कर्तृत्ववान नेता होता. लोकांच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास
करून निर्णय घेणे हे त्याचे वैशिष्ट्य होते. सकाळी सहा वाजल्यापासून त्याचे काम
सुरू व्हायचे. हा आमच्यासाठी प्रचंड मोठा आघात आहे. या परिस्थितीला सामोरे जावे
लागेल आणि त्यांची कार्यपद्धती पुढे नेली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले की,
“नवी पिढी या आव्हानांना सामोरी जाईल याची मला खात्री आहे.
अजितदादांच्या जाण्याने जो धक्का बसला आहे, त्यातून
सावरण्यासाठी जे करता येईल ते आम्ही करू.”