शांति कुटीर, कन्नूर येथे रामनवमी सप्ताहाची भक्तिमय सुरुवात

विजयपूर: भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त आणि चैत्र नवरात्रोत्सवाच्या शुभप्रसंगी सुक्षेत्र शांती कुटीर, कन्नूर येथे रामनवमी सप्ताहाची सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्तात्रेयांचे पूजन, सद्गुरू महाराजांच्या मातोश्री यांच्या समाधी व निवासस्थानाचे पूजन तसेच समाधी मंदिर आणि अधिष्ठान प्रतिमेचे पूजन करून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ग्रंथराज दासबोधाच्या "ग्रंथारंभ निरूपण समास" या भागावर श्री गणेश नाईक यांनी प्रवचन दिले. यावेळी कन्नूर, विजयपूर, बंगलोर, मंगळूर, हुबळी, जमखंडी, डोमनाळ, अर्जनाळ, पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सोलापूर आणि हैदराबाद आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाची सांगता ६ एप्रिल रोजी होणार असून, या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. उद्घाटन सोहळ्यात शांतिकुटीर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. रवी दानी, श्री. व्ही. डी. पाटील, डॉ. एस. के. कन्नूर, श्री. रमेश कन्नूर, श्री. पी. एच. लमाणी, श्री. अजित कन्नूर, श्री. श्रीकृष्ण संपगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दिंडी पदयात्रांचे वैशिष्ट्य:
या सप्ताहाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सहा दिशांमधून
येणाऱ्या दिंडी पदयात्रा. नीती-भक्ती, आदर्शग्राम-स्वदेशी अभियान अंतर्गत सुरू झालेली ही यात्रा गेली ३३ वर्षे अखंड सुरू
आहे. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून २०० हून अधिक गावांना
भेटी देऊन गावकऱ्यांना विधायक कार्यासाठी प्रेरित केले जाते.
प्रमुख दिंडी मार्ग:
- इंडी
तालुका: अर्जनाळ - भक्ती कुटीर
- आलमेल
तालुका: बोम्मनहल्ळळी -
ब्रह्मानंद कुटीर
- विजयपूर
तालुका: खतिजापूर
- जत
तालुका: रामतीर्थ, ककमरी - ज्ञानकुटीर
- सोलापूर
जिल्हा: बार्शी, मोहळ - अध्यात्म कुटीर
ही सर्व दिंडी पथके ५ एप्रिल रोजी शांती कुटीर, कन्नूर येथे दाखल होणार असून, ६ एप्रिल रोजी रामनवमी व सप्ताह समाप्तीच्या विशेष सोहळ्यात सहभागी होतील. सप्ताहाच्या निमित्ताने "अध्यात्म भांडार ग्रंथमालेतील" श्रेष्ठ ग्रंथ भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, "शांतिकुटीर संदेश" या त्रैमासिकाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.