शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध योगी सरकार, पत्रकार परिषदेत जोरदार आरोप

वाराणसीचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर थेट हल्लाबोल केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या शंकराचार्य दर्जाचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. “आम्हाला २४ तासांच्या आत पुरावे देण्यास सांगण्यात आले आणि मेळ्यात प्रवेश का नाकारला जाऊ नये, असा सवाल करण्यात आला. आम्ही त्यावर उत्तर दिले आहे. अद्याप आमचा प्रतिसाद नाकारण्यात आलेला नाही, याचा अर्थ आमचा युक्तिवाद त्यांना योग्य वाटला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रयागराजमध्ये स्नानासंबंधीचा मुद्दा आता मागे पडल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, आता हा प्रश्न खऱ्या हिंदूंचा आणि बनावट हिंदूंचा आहे. प्रशासनाने मुद्दा उपस्थित केला, मात्र त्यांनी आमच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही आणि आम्ही तो आरोप स्वीकारण्यास नकार दिला.

आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’

अविमुक्तेश्वरानंद यांनी आरोप केला की, सनातनी समाजात त्यांची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. योगी आदित्यनाथ हे त्यांच्या निकटवर्तीय रामभद्राचार्य आणि इतरांच्या माध्यमातून हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. धर्मसम्राट स्वामी करपात्री महाराजांसह अनेक सनातनींवर पूर्वी अत्याचार झाले. आज आम्ही आवाज उठवत असल्यामुळे आम्हालाही आणि गोभक्तांनाही अन्याय सहन करावा लागत आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून हिंदू ओळखीचा पुरावा मागितला

शंकराचार्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्ही आमच्याकडे प्रमाणपत्र मागितले. धर्माला प्रमाणपत्रांची गरज नसते, पण तरीही आम्ही पुरावे दिले. आता वेळ आली आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते पुढे म्हणाले की, हिंदू असणे केवळ भाषणे देणे किंवा भगवे कपडे घालणे इतकेच मर्यादित नाही. गोरक्षण, गोसेवा आणि धर्माचे रक्षण हेच खरे निकष आहेत. संपूर्ण सनातनी समाज आता मुख्यमंत्र्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा मागत असल्याचा दावाही त्यांनी केला.