शहापूर : शाळेत विद्यार्थिनींची अमानवीय तपासणी, प्राचार्यासह आठ जणांवर गुन्हा

शहापूर (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दामानिया इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये एक संतापजनक प्रकार घडला आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याने, मासिक पाळीच्या संशयावरून इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या सुमारे 125 विद्यार्थिनींची अंतर्वस्त्र तपासणी करण्यात आली. या अमानवीय प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावर शहापूर पोलिसांकडून POSCO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राचार्य आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं? 8 जुलै 2025 रोजी, शाळेच्या शौचालयात रक्ताचे डाग आढळले. यानंतर शाळेच्या प्राचार्यांनी धक्कादायक निर्णय घेत सर्व मुलींच्या गणवेशासह अंतर्वस्त्र तपासण्याचे आदेश दिले. या तपासणीदरम्यान मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागला. काहींच्या बोटांचे ठसेही घेतले गेले, तर रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवले गेले, ही माहिती पालकांनी दिली. या प्रकारामुळे अनेक मुली भयभीत झाल्या आणि रडत रडत घरी परतल्यावर पालकांना सर्व प्रकार सांगितला. 9 जुलै रोजी संतप्त पालकांनी शाळेसमोर आणि शहापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. कारवाई आणि चौकशी सुरू शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्य, चार शिक्षिका व तीन कर्मचाऱ्यांविरोधात POSCO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी शाळेला भेट देत तपास सुरू केला असून, शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्राचार्यांना बडतर्फ करण्याचे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुलींच्या हक्कांचा अपमान पालकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सांगितले, “हा केवळ अमानवीय कृत्य नाही, तर मुलींच्या स्त्रीत्वाचा आणि मानवी हक्कांचा अपमान आहे.” अनेक विद्यार्थिनी सध्या शाळेत जाण्यास घाबरत आहेत. गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांनीही याप्रकरणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समाजमाध्यमांवर संताप या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त होत असून, लोकांनी #JusticeForGirls #ShahapurSchoolIncident यासारखे हॅशटॅग वापरून निषेध व्यक्त केला आहे. अनेक महिला संघटनांनीही याप्रकरणी चौकशीसाठी लेखी मागण्या केल्या आहेत.