भीषण अपघात : तामिळनाडूमध्ये स्कूल बसला रेल्वेची धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

कडलूर | तामिळनाडू:- कडलूर जिल्ह्यातील सेम्मानकुप्पम गावाजवळ आज (दि.८) सकाळी एक भीषण अपघात घडला. शाळेची बस रेल्वे फाटक ओलांडत असताना, त्या वेळी चिदंबरमकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताच्या वेळी बसमध्ये पाच विद्यार्थी होते. जखमींना तातडीने कडलूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा झाला अपघात?
चेम्मनकुप्पमजवळ रेल्वे फाटक क्रमांक १७० हा नॉन-इंटरलॉक्ड फाटक आहे. या फाटकावर गेटमन रेल्वे आल्याची सूचना देत फाटक बंद करत असतानाही बसच्या चालकाने निष्काळजीपणे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चिदंबरमकडे जाणारी व्हिल्लुपुरम–मयिलादुथुराई प्रवासी ट्रेन (56813) आली आणि बसला भीषण धडक दिली. धडकेमुळे बस सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत गेली.

घटनास्थळी एकच आक्रोश
अपघातानंतर बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी जोरात आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्यांनी मुलांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली आणि तातडीने प्रशासनाला माहिती दिली.

चालकावर निष्काळजीपणाचा ठपका
रेल्वे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेला बस चालकाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बस चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.