सयाजी शिंदे यांची राज ठाकरे यांच्यासोबत विशेष बैठक; तपोवनातील वृक्षतोडींवर मनसेसह कलाकारांचा तीव्र विरोध
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून
साधुग्राम उभारणीसाठी तपोवन परिसरातील तब्बल 1700 झाडे तोडणे, पुर्नरोपण
करणे किंवा फांद्यांची छाटणी करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. या मोठ्या
वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि अनेक
कलाकारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे हे या आंदोलनाचे प्रमुख
चेहरे बनले असून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी
याआधीच या वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. तपोवन बचाव मोहिमेला जोर मिळत असताना,
सयाजी शिंदे यांनी त्यांची विशेष भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत मनसे
चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते. बैठकीत तपोवन परिसरातील जैवविविधतेचे
रक्षण, वनराईचे संवर्धन आणि नागरिकांना सोबत घेऊन चळवळ अधिक
मोठ्या प्रमाणावर राबविण्याबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी पर्यावरणसाठी आवश्यक
ते सहकार्य करण्याची तयारी मनसेकडून असल्याचे सांगितले.
“कुंभमेळ्याचा आदर आहे, पण झाडे तोडू नयेत” – सयाजी शिंदे
भेटीनंतर सयाजी शिंदे म्हणाले की,
“झाडे कशी वाचवावीत याबाबत आमची चर्चा झाली. १५ फुटांची झाडे लावली
तरी त्याचा उपयोग नाही. मुद्दा त्या ‘असलेल्या झाडांचा’ आहे. ती झाडे तोडली जाऊ
नयेत. कुंभमेळ्याचा आम्हाला आदर आहे, पण तपोवनातील वनराई
तुटू नये ही आमची भूमिका आहे.”