स्व. बाबूराव अण्णा यांची राजकारण आणि समाजकारणातील कारकिर्द प्रेरणादायी

स्व. बाबूराव अण्णा यांची राजकारण आणि समाजकारणातील कारकिर्द प्रेरणादायी आहे. भाई छन्नुसिंह चंदेले यांनी त्यांना राजकारणात आणले. काँग्रेस पक्षात घेऊन नगरसेवक बनवले. पुढे बाबूराव अण्णा आपल्या कर्तृत्वाने नगराध्यक्ष बनले, महापौरही झाले. तब्बल 28 नगरसेवक निवडून आणले. ते दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले. एका अर्थाने ते सोलापूरचे किंगमेकर होते. सोलापूर शहराप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणातही बाबूराव अण्णांचा दबदबा होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी व्यापारी, शेतकरी, कामगार, गोरगरीब, दलित, पीडित जनसामान्यांचे जीवन उजळून टाकले. स्वर्गीय बाबूराव चाकोते यांच्या रूपाने श्री सिद्धेश्वरांच्या पुण्यनगरीला विवेकी विचारांचे नेतृत्व लाभले. त्याकाळी शेतकर्‍यांची बँक अशी ख्याती असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत कृषी अधिकारीच नव्हता. बाबूराव अण्णा बँकेचे अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम कृषी अधिकारी व अभियंत्यांची नव्याने भरती केली. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून शरद सहकारी सूतगिरणीची स्थापना केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आणली. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात सोलापूरची बाजार समिती लौकिक पात्र ठरली. बाजार समितीची योजनाबद्ध वास्तू पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक येत असत आणि आपल्या गावी जाऊन याची अंमलबजावणी करीत असत.


बाबूराव अण्णा दयाळू आणि सहृदयी होते. त्यांनी अनेकांचे कल्याण केले. जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, महानगरपालिका, साखर कारखाना, सूतगिरणी, सरकारी कार्यालय, निमसरकारी कार्यालयात बाबूराव अण्णांनी अनेकांना नोकरीला लावून त्यांचा संसार उभा केला. विणकरांसाठी वसाहत उभी केली. आज ही सर्व कुटुंबे स्थिरस्थावर असून त्यांचा दुवा अण्णांना मिळाला आहे. मार्डीला वसतिगृह सुरु केले. काम करताना अनेक गरीब लोक भेटत असत. त्यांना अण्णा सढळ हातांनी मदत करायचे. जात-धर्म न पाहता समोर येणार्‍या प्रत्येकाची गरज पूर्ण करीत असत. म्हणून अण्णांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे.

राजकारणात आणि सहकार क्षेत्रात बाबूराव अण्णांनी पक्षभेद विसरून काम केले. महापुरुषांविषयी त्यांना प्रचंड आदर होता. जिल्हा बँकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला छत्र बांधून सुशोभित केले. मोहिते पाटील कुटुंबाविषयी जिव्हाळा होता. डीसीसी बँकेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळा त्यांनीच बसवला. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अण्णांच्या मनात अपार प्रेम आणि श्रध्दा होती. त्यामुळे पवारांच्याच हस्ते मोठ्या थाटात दोन्ही कार्यक्रम पार पाडले.


बाबूराव अण्णांच्या कार्याचा वसा खर्‍या अर्थाने त्यांची मुले आणि नातवंडे पुढे नेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, दोनदा आमदार, पंधरा वर्षे मार्केट कमिटीचे सभापती, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, शरद सूतगिरणीचे अध्यक्ष, राज्यस्तरावरील विविध क्रीडा संघटनांची पदे भूषवत बाबूराव अण्णांनी त्यांच्या 55 वर्षांच्या सामाजिक, राजकीय जीवनात उत्तुंग अशी कामगिरी केली. ते जनसामान्यांसाठी झटले. लोककल्याणकारी योजना राबवल्या. सर्वसामान्यांना लाभ मिळवून देताना त्यांचा आर्थिक स्थर उंचावला पाहिजे अशी भूमिका ठेवून आयुष्यभर झटणारे बाबूराव अण्णा आज आपल्यात नाहीत. परंतु लोकनेता कसा असावा याचा त्यांनी आदर्श घालून दिला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.


महिबूबसाब वडकबाळकर (माजी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर)