जम्मूमध्ये सुरक्षा दलांची धडक कारवाई; दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त
जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम
अधिक तीव्र झाली आहे. रविवारी सुरक्षा दलांनी डोडा जिल्ह्यातील घनदाट जंगल परिसरात
मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. या ठिकाणी दहशतवाद्यांचे
अस्तित्व असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक
पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
यांनी संयुक्त मोहीम चालवत दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेपर्यंत
पोहोचले. तिथे पोहोचल्यावर दहशतवादी अनुपस्थित आढळले, मात्र
त्यांनी घाईघाईने ठिकाण सोडल्याचे स्पष्ट झाले. जवानांनी घटनास्थळावरून एक रायफल
आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केला. गेल्या काही महिन्यांपासून
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटक व नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार
वाढले आहेत. विशेषतः पहलगाममध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी
संपूर्ण प्रदेशात सतत धडक मोहीमा सुरू केल्या आहेत. डोड्यातील ही कारवाई त्याचाच
एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांचा दावा आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवादी गटांना पूर्णपणे निष्प्रभ करण्यासाठी
पुढील काही दिवसांत आणखी कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे.