पहलगाम हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवली, मोबाईल-कॅमेऱ्यावर बंदी

पंढरपूर  एप्रिल २६: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे, प्रवेशासाठी फक्त ‘व्हीआयपी गेट’ मंदिरातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र घालणे सक्तीचे करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी प्रवेश व निर्गमासाठी फक्त व्हीआयपी गेटचाच वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारांवर कडक तपासणी आणि यंत्राद्वारे स्कॅनिंग मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी अत्याधुनिक मशीनद्वारे केली जात आहे. खासगी सुरक्षा यंत्रणांसह पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसरात मोबाईल आणि कॅमेऱ्यावर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली असून, कडक अंमलबजावणी सुरू आहे. मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले की, "भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षारक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत."