'सर्किट'ला SEBI चा झटका, शेअर फसवणुकीत कारवाई

मुंबई | अभिनेता अरशद वारसी, त्यांची पत्नी मारिया गोरेटी आणि त्यांचा भाऊ यांच्यावर भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (SEBI) एक वर्षासाठी शेअर बाजारात गुंतवणुकीवर बंदी घातली आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या "पंप अँड डंप" फसवणूक योजनेत सहभागी असल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाखांचा दंड आणि १.०५ कोटी रुपयांची अवैध कमाई परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

मार्च 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, साधना ब्रॉडकास्ट (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम्स) या कंपनीचे शेअर्स खोट्या बातम्यांद्वारे आणि सोशल मीडियावरच्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओजद्वारे कृत्रिमरीत्या फुगवले गेले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात विक्री करून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. सेबीच्या तपासानुसार, या योजनेत 60 हून अधिक लोकांचा सहभाग होता.

अरशद वारसी यांची भूमिका काय?

सेबीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, अरशद वारसी, त्यांची पत्नी आणि भाऊ स्वतःच्या डीमॅट खात्यांतून मोठ्या प्रमाणात शेअर ट्रेडिंग करत होते. त्यांचे मनीष मिश्रा नावाच्या मुख्य सूत्रधारासोबत व्हॉट्सअ‍ॅप संवादही सापडले, ज्यामध्ये २५ लाख रुपयांच्या व्यवहाराची चर्चा होती. या व्यवहारांमधून त्यांनी लाखोंचा नफा कमावला.

फसवणुकीत सोशल मीडियाचा वापर

The Advisor, Midcap Calls, Profit Yatra, Moneywise, India Bullish या यूट्यूब चॅनेल्सवरून साधना ब्रॉडकास्टबद्दल खोट्या, सकारात्मक बातम्या पसरवल्या गेल्या. या माहितीवर विश्वास ठेवून अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी केले.

प्रमुख आरोपी व कारवाई

  • मनीष मिश्राफसवणुकीचा सूत्रधार, ₹5 कोटी दंड
  • गौरव गुप्तासर्वाधिक नफा (₹18.33 कोटी), रक्कम परत करण्याचे आदेश
  • साधना बायो ऑइल्स प्रा. लि. – ₹9.41 कोटी नफा, परतफेड आदेश
  • इतर आरोपीराकेश गुप्ता, सुभाष व पियूष अग्रवाल, लोकेश शाह यांना प्रत्येकी ₹2 कोटी दंड
  • IPS अधिकारीप्रकरण सेटलमेंटद्वारे निकाली

गुंतवणूकदारांसाठी इशारासेबीने या प्रकरणातून धडा घेत "सोशल मीडियावर आधारित शेअर टिप्स तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नये," असा इशारा दिला आहे. हे प्रकरण तांत्रिक पद्धतीने सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक कशी केली जाते, याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.