बसवेश्वर नगर येथील पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ कार पेटली
संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. 2- उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील अक्कलवाडे पाटील यांच्या बसवेश्वर नगर येथील पेट्रोल पंपावर आज दुपारी एका स्कार्पिओ कारने अचानक पेट घेतल्याने ही कार जागेवरच जळून खाक झाली. डिझेल भरत असताना गाडीतून धूर येत असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी चालकाला गाडी पुढे नेण्यासाठी सांगितले. गाडी पुढे घेतली असता कारने लगेचच पेट घेतला. गाडी पेटल्याचे पाहून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे दहा सिलेंडर वापरले मात्र ही आग विझली नाही. यानंतर पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक धर्मराज जाधव यांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशामक दलाच्या एका बंबाच्या पाण्याद्वारे ही आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. उन्हामुळे वायरिंग शॉट सर्किट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ही स्कॉर्पिओ गाडी माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांची असल्याची माहिती पुढे आली आहे.