राजस्थानातील शाळेचं छत कोसळलं – ३ ते ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ६० हून अधिक ढिगाऱ्याखाली

झालावाड :-
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात भीषण दुर्घटना घडली
आहे. स्थानिक प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याने सध्या पर्यंत ३ ते ४ विद्यार्थ्यांचा
मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी प्रार्थना सुरू
असतानाच घडली. या दुर्घटनेत सुमारे ६० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबल्याचा
अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम
युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना मनोहरथाना
येथील सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक घटनास्थळी धावून गेले असून, मदतीचे कार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अमित कुमार
बुडानिया यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावा घेतला आहे. सदर इमारत
जुनी असल्याची शक्यता व्यक्त होत असून, भविष्यातील
इमारतींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्य प्रशासन व आपत्ती
व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.