"रुग्णांच्या सेवेत देव दिसला": सोलापूरमधील पुरस्कार सोहळ्यात डॉ. जयंत करंदीकर
.jpeg)
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. 20- आज समाजात चांगली माणसे घडविणारे लोक कमी आहेत पण बिघडविणारे जास्त असल्याची खंत व्यक्त करीत आपण त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णसेवेतून माणसातील देव पाहिला असल्याची भावना कुर्डूवाडी येथील संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जयंत करंदीकर यांनी व्यक्त केली.
रविवारी, डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ब्राह्मण समाज सेवा संघ व चाटी ट्रस्टच्यावतीने अकलूजचे डॉ. मनोहर इनामदार यांना डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर कुर्डूवाडीचे डॉ. जयंत करंदीकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. करंदीकर यांनी समाजातील चाली, रिती आणि प्रथांविषयी परखड भाष्य करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर चाटी ट्रस्टच्या अध्यक्षा मीनाताई चाटी व ब्राह्मण सेवा संघाचे सचिव वामन कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
21 हजार रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुणेरी पगडी असे जीवनगौरव पुरस्काराचे तर 11 हजार रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुणेरी पगडी असे समाजभूषण पुरस्काराचे स्वरूप होते.
चाटी ट्रस्टचे सचिव राम तडवळकर यांनी प्रास्ताविक तर माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.