सौरभ भारद्वाज यांची 'आप'च्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी आमदार सौरभ भारद्वाज यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारद्वाज यांनी माजी मंत्री गोपाळ राय यांची जागा घेतली आहे. गोपाल राय यांना गुजरात प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे, तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर पंजाब राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय राज्यसभा खासदार संदीप पाठक यांना छत्तीसगडचे प्रभारी, तर पंकज गुप्ता यांना गोव्याचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये मेहराज मलिक यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. ते राज्यातील आम आदमी पक्षाचे एकमेव आणि पहिले आमदार आहेत. आम आदमी पक्षाला अलीकडेच दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक पातळीवर हा मोठा बदल केला आहे. पक्षासमोर पंजाबमध्ये आपली सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सिसोदिया पंजाबमध्ये सक्रिय होते. विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपने या बदलावर टीका केली आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पंजाबला नुकतीच भेट दिली असून पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.