संत तुकाराम गाथा होणार डिजीटल : उदय सामंत

शिर्डी : राज्य सरकारने संत तुकारामांच्या गाथेतील साडेचार हजार अभंग डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नामवंत गायकांच्या आवाजात हे अभंग स्वरबद्ध केले जात असून, दृकश्राव्य माध्यमातून ते सादर केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. वारकरी साहित्य परिषद आयोजित 13 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष हभप संजय महाराज देहूकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, तसेच विविध राज्यांतील वारकरी संत उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले की, केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई यांच्या साहित्यातून मराठी अभिजात भाषेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती असून, संत साहित्याचे ग्रामीण भागांमध्ये प्रसारासाठी वारकरी साहित्य संमेलनांचे आयोजन आवश्यक आहे. इंग्रजीच्या प्रभावात मराठीची घट कमी करण्यासाठी आणि मराठीबद्दल प्रेम वाढवण्यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच मराठी भाषा विभागाचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची योजना आखली जात असून, 17 बृहन्महाराष्ट्र मंडळांची संख्या वाढवून ती 50 करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले. परदेशातही संत साहित्य संमेलन भरविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्य सरकारकडून वारकरी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.