संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा

सातारा :  माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी सुरू असल्याने राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर पडलेला छापा हा विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप सरकारचा इशारा असल्याचे मानले जात आहे. या छापेमारी कारवाईतीळ तपशील अद्याप उघड झाले नाहीत. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा टाकल्याचे अधिकृत वृत्त आहे.  बुधवारी  पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बंगला परिसरात पोलिस पथक तैनात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापा टाकला असल्याचे बोलले जाते. रघुनाथराजे आणि संजीवराजे हे दोघे रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. आयटी विभागाच्या या कारवाईचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधानसभा निवडणुकीआधी संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, अशी रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.