संजय शिरसाट यांचा 'पैशांच्या बॅगेसह' व्हिडिओ व्हायरल; स्पष्टीकरणात म्हणाले – “बॅगेत कपडे आहेत”

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा एक व्हिडीओ समोर आला असून, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा बेडरुममध्ये ‘पैशांनी भरलेल्या बॅग’सह असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विरोधकांकडून या प्रकरणावरून गंभीर आरोप होत असताना, शिरसाट यांनी यावर खुलासा करत “बॅगेत पैसे नाहीत, ती प्रवासाची बॅग असून, कपड्यांनी भरलेली आहे” असा दावा केला आहे. या व्हिडीओला संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले. त्यांनी शिंदे गटावर टीका करत आरोपांची मालिका सुरू केली. या व्हिडीओमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संजय शिरसाट यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी तो व्हिडीओ नुकताच पाहिला. व्हिडीओत दिसणारे घर माझीच बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे, बाजूला माझा लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवली आहे, कारण मी प्रवास करून आलो होतो. कपडे काढून मी बेडवर बसलो आहे. एवढे पैसे बॅगमध्ये कसे ठेवेन? घरातील अलमारी मेल्या आहेत का? पैसे असते तर मी अलमारीत ठेवले असते.” तसेच, त्यांनी आरोप फेटाळताना सांगितले की, “त्यांना फक्त पैसेच दिसतात. एकनाथ शिंदे विमानातून उतरले, तेव्हा सुरक्षारक्षकांच्या हातात बॅगा होत्या. त्या बॅगांमध्येही पैसे आहेत असा आरोप केला गेला. आता माझ्या बेडरुममध्ये ठेवलेली बॅगही संशयित ठरवली जात आहे.” या व्हिडीओवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले असून, राज्याच्या राजकारणात या व्हिडीओने मोठे वादळ निर्माण केले आहे.