अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा खरपूस समाचार; शेतकऱ्यांच्या आक्रोशाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार
मुंबई | २५ सप्टेंबर २०२५
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यातील वक्तव्यावरून राजकीय
वादंग निर्माण झाला आहे. कर्जमाफीबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवारांचा पारा चढला
आणि त्यांनी “पैशाचं सोंग करता येत नाही” असं उत्तर दिलं. या वक्तव्याचा आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खरपूस
समाचार घेतला.
राऊत म्हणाले,
“पैशाचं सोंग करता येत
नाही ना, मग सरकार चालवू नका. महाराष्ट्रावर ही वेळ कोणी
आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नका; त्यांच्या संसारात पुरामुळे उध्वस्त झाले आहेत.”
ते पुढे म्हणाले,
“महाराष्ट्रावर ९ ते १०
लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. राज्याला कोणी कर्ज द्यायला तयार नाही. ६५ हजार कोटी
व्याज भरलं जातं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत आहेत, पण केंद्र सरकार दमडी द्यायलाही तयार नाही.”
राऊत यांनी यावेळी जाहीर केले की, उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. “लातूरपासून संभाजीनगरपर्यंतचा दौरा करत उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरतील
आणि शेतकऱ्यांचा आवाज मांडतील,” असं ते म्हणाले. राऊतांचा
सवाल — “जे सरकार विरोधी पक्षनेता ठेवायला तयार नाही,
त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवायच्या?”
हायलाइट्स
- अजित पवारांच्या
“पैशाचं सोंग” वक्तव्यावर राऊतांचा जोरदार हल्लाबोल
- महाराष्ट्रावर ९–१०
लाख कोटी कर्ज असल्याचा राऊतांचा आरोप
- ६५ हजार कोटी
व्याजाच्या ओझ्यामुळे राज्य संकटात
- उद्धव ठाकरे आजपासून
मराठवाडा दौऱ्यावर