सांगलीत खळबळ: अंकली पुलावरून विवाहितेची कृष्णा नदीत उडी; शोधकार्य सुरू
सांगली :- अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील पुलावरून एका
विवाहितेने थेट नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या
सुमारास घडली. प्राजक्ता योगेश देसाई (वय २४, रा. गावभाग, सांगली)
असे या विवाहितेचे नाव असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. काही नागरिकांनी हा
प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पुलावर मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच
सांगली ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्पेशल रेस्क्यू फोर्स या
आपत्कालीन पथकाला पाचारण केले. त्यानुसार पथकाने नदीपात्रात उतरून शोधकार्य सुरू
केले. मात्र, विवाहितेने ज्या ठिकाणाहून उडी मारली त्या
भागात कृष्णा नदीचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत प्राजक्ता देसाई यांचा शोध लागलेला नव्हता. रेस्क्यू
फोर्सकडून सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्यात आले असून बुधवारी पुन्हा सकाळी
शोधकार्य हाती घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.