स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही संघ मदतीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या
दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांना संबोधित करताना पाच मुद्दे मांडत त्याची
अंमलबजावणी आमदारांनी करावी, असे म्हटले आहे. यानंतर आता भाजपचे
वरिष्ठ नेते आणि संघाच्या नेत्यांमध्ये आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत
चर्चा होणार आहे. हिंदुत्वाचा अजेंडा आणि पुढील पाच वर्षांचे नियोजन याबाबत बैठकीत
चर्चा केली जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेश राज्य मंत्रिमंडळात भाजपचे २१,
शिवसेनेचे (शिंदे) ९ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ७ मंत्री
आहेत. मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आव्हान भाजपसमोर आहे.
या निवडणुकांसाठी संघाचे सहकार्य मिळावे, अशी भाजपची अपेक्षा
आहे. हिंदुत्वासह संघाला अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा
भाजप आणि संघामधील बैठकीचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाच्या विषयांसह समाज आणि
जनतेशी निगडित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विषयांवरही यावेळी चर्चा केली जाईल. बांगलादेशमध्ये
हिंदूंवर होत असलेले अत्याचार, सीमेपलीकडून विनाकागदपत्र
होणारे स्थलांतर यांसारख्या इतर काही विषयांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. भाजपच्या
एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले की, आमच्यापैकी बहुतेकजण
संघाच्या मुशीतून आलेलो आहेत. संघ आमचा मार्गदर्शक आहे. याआधीही आम्ही संघाशी
सल्लामसलत केलेली आहे. आता होणारी बैठक ही आमच्यात योग्य समन्वय राखून पुढील
धोरणांविषयी चर्चा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाजप असो किंवा संघ आमचा
उद्देश एकच आहे, तो म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीला सेवा
देणे, त्याला विकासाचा लाभ मिळवून देणे. हिंदुत्व हा भाजप,
संघ आणि संबंधित संघटनांचा अविभाज्य घटक आहे. नागपूरमधील संघाच्या
मुख्यालयातील एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ हा शांतपणे काम करतो. कुणाचा तरी विजय किंवा पराभव करणे, अशा छोट्या उद्देशांसाठी संघ काम करत नाही. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून
आपले हित साध्य करण्यासाठी दूरदृष्टीसह संघ काम करत आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ हा स्वतःला सामाजिक संघटन म्हणून सांगत असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी
भाजपसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलेले आहे. संघाच्या अनेक नेत्यांना
भाजपमध्ये पदे दिली गेलेली आहेत. मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत
महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागा जिंकता आल्या. संघ आणि भाजपमध्ये समन्वयाची कमतरता
असल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचे बोलले गेले. यानंतर भाजपच्या नेत्यांनी आणि
विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत योग्य समन्वय राखत सत्ता
मिळवली. विधानसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आज त्यांनी (संघ) आमची मदत केली आहे. त्यांच्या मदतीमुळेच आम्ही भारत
जोडोचे नरेटिव्ह आणि अराजकतावादी शक्तींना दूर ठेवू शकलो आहोत. लोकसभेचा निकाल
लागल्यानंतर आम्ही समन्वय राखण्यास सुरुवात केली होती.